राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ . पद्मसिंह पाटील आणि राजा जगजितसिंह यांचाही भाजप प्रवेश निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातलग व उस्मानाबाद जिल्ह्यातील दिग्गज नेते, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी आज आपले पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. एका मागोमाग एक नेते पक्ष सोडत असल्यामुळं अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा आणखी एक मोठा हादरा मानला जात आहे. ‘
मला तुमच्याशी काही बोलायचं आहे’ असं लिहिलेले आमदार राणा यांचे बॅनर दोन दिवसांपासूनच शहरात झळकले होते. तेव्हापासून पाटील पिता-पुत्र राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा होती. अजित पवार यांचे मेहुणे असलेल्या पद्मसिंह यांचं मन वळवण्याच्या हालचाली पडद्यामागून पवार कुटुंबीयांकडून सुरू होत्या. मात्र, त्यात यश आलं नाही. अखेर आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
‘कुठल्याही घाईगडबडीत किंवा कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास, पाणी प्रश्न व रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचं राणा जगजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं.