चर्चेतली बातमी : पवारांचा संताप !! ५० वर्षात त्यांना अशी कधी पाहिलं नाही , बाबांच्या वागण्याचं सुप्रिया सुळे यांनाही आश्चर्य

श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत नातेवाईकांशी संबंधित एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिडल्यामुळं राज्यभरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. खुदद् पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय.
गेल्या ‘५० वर्षांत मी त्यांना कधी असं चिडलेलं पाहिलं नाही,’ असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. पक्षातील नेत्यांबरोबर तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत, असा प्रश्न शुक्रवारी पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर ते संतापले आणि पत्रकार परिषदेतून उठले. त्यांचा हा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुप्रिया सुळे या देखील वडिलांच्या वागण्यानं चकित झाल्या आहेत. तशी कबुलीच त्यांनी दिलीय. ‘कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांदाच चिडलेला दिसला. मलाही आश्चर्य वाटलं. ५० ते ५२ वर्षांत मी त्यांना कधी असं पाहिलेलं नाही. पण वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला एकच प्रश्न पाचवेळा विचारल्यावर चीडचीड होऊ शकतो. शेवटी माणूस आहे. खरंतर आपल्या पिढीनं याबाबत आत्मचिंतन करायला हवं,’ असं सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीवरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची मुलं पक्ष सोडण्यासाठी पुढाकार घेत आहेत. वडिलांना त्यांच्यामागून जावं लागत असल्याचं चित्र आहे. त्यावरही सुळे यांनी संताप व्यक्त केला. ‘आपल्याला मोठे करणारे आई-वडील असतात. त्यांची मान झुकू नये असं आपण वागणं गरजेचं आहे. संधीसाधूपणासाठी आई-वडिलांना डावलून मुलगा पुढं जात असेल तर दुर्दैव आहे. वडिलांना असं वेठीस धरणं बरं नाही. हे पाहिलं की वंशाच्या दिव्यापेक्षा मुली बऱ्या, असं वाटतं. मुली किमान आई-वडिलांचा मान राखण्यासाठी झटतात,’ असं त्या म्हणाल्या.