धुळे: शिरपूरजवळील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, ७ जणांचा मृत्यू

शिरपूरजवळील एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. हा स्फोट कशाचा होता, किंवा मृत्यू पावलेले ७ जण कामगार होते की अन्य कुणी याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला हादरे बसल्याने लोकांमध्ये घबराट पसरले.
मिळालेली माहिती अशी की, शिरपूर-शहादा महामार्गावर असलेल्या वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला. फॅक्टरीत १०० कामगार काम करत होते. फॅक्टरीत कामगार अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.