आरएसएसचे आरक्षणविषयक विसंगत धोरण देशासाठी धोकादायक : मल्लिकार्जुन खरगे

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गरिबांचे आरक्षणरद्द करण्याचा डाव आहे. दुसरीकडे उच्च वर्णियांना दहा टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संसदेत निर्णय घेतला जातो. ही विसंगती देशासाठी धोकादायक आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात भाजपचा जनाधार वाढत असल्याबद्दलही खरगे यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
कोल्हापुरात बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिव्या देऊन काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेसमध्येही हिंदू आहेत. पण आम्ही हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ लावत नाही. हिंदुत्वाचा मक्ता केवळ संघ आणि भाजपनंच घेतला आहे काय? असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम काँग्रेसच्याही काळात झालं. पण त्याचं श्रेय लाटण्याचं काम आम्ही केलं नहाी, असं सांगतानाच काँग्रेस नेत्यांच्या घामामुळेच महाराष्ट्र घडला, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी निश्चित झाली आहे. घटक पक्षांसोबतही चर्चा सुरू आहे. जागावाटपाबाबत मंगळवारी चर्चा होणार असल्याची माहिती देतानाच स्वाभिमानी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीही आमच्यासोबत असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
पुढील विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा थोरात यांनी यावेळी समाचार घेतला. पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल ते फडणवीसांनी ठरवू नये. त्यांनी स्वत: आरशासमोर उभे राहावे. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल, असा टोला लगावतानाच पुढील मुख्यमंत्रीही आघाडीचाच असेल, असा दावाही त्यांनी केला.