औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पाच शाळांना मिळणार महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा दर्जा

औरंगाबाद जिल्हा परिषदेने MIEB प्रमाणित केलेल्या जिल्हा परिषदेच्या पाच शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळांमध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्वाकांक्षी आव्हान स्वीकारले आहे. समाज व पालकांची इच्छा व सहभाग असेल तरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण होतील. त्यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेणारे दर्जेदार शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीम पवनीत कौर यांनी यावेळी केले.
या उपक्रमासाठी निवडलेल्या लासुरगाव ता वैजापूर, गाडीवाट ता औरंगाबाद , वरवंडी तांडा ता पैठण, जळगाव मेटे ता फुलंब्री तसेच केऱ्हाळा ता सिल्लोड शाळांची एक कार्यशाळा आज घेण्यात आली. यात शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, गावातील सक्रीय व्यक्ती, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका असे 260 लोक सहभागी झाले होते.
दि. 29 ऑगस्ट 2019 रोजी प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प औरंगाबाद पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय शाळा निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी ता शिरूर जि पुणे येथील मुख्याध्यापक श्री दत्तात्रय वारे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सतीश वाबळे हे प्रमुख मार्गदर्शक होते. शाळांची निवड करून पालकांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री सुरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. याप्रसंगी डॉ सुभाष कांबळे, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, श्रीम अश्विनी लाटकर उपशिक्षणाधिकारी हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रमेश ठाकूर , राजेश महाजन शिक्षण विस्तार अधिकारी व सोज्वळ जैन यांनी परिश्रम घेतले.