Maharashtra Vidhansabha : प्रकाश आंबेडकरांच्या अटी काँग्रेसला वाटतात अशक्य , मनसेचीही अडचण , काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आंबेडकर -ठाकरेंच्या चक्रव्युव्हात !!

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार के. सी. पाडवी उपस्थित होते. आजच्या बैठकीत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. गेल्या आठवड्यात घोषणा झालेल्या छाननी समितीची ही प्राथमिक बैठक होती. ५ सप्टेंबर रोजी समितीची आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सोपविण्यात येईल, असे वृत्त आहे.
दरम्यान काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीसमोर पेच प्रसंग असा आहे कि , बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या भाजप-शिवसेनाविरोधी आघाडीत सामील व्हायचे नाही, शिवाय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे सोबतही प्रकाश आंबेडकर यांना जायचे नाही काँग्रेसचीही मनसेबाबत अशीच भूमिका आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीसमोर भाजप -सेनेचे मोठे आव्हान असताना प्रकाश आंबेडकरप्रणीत बहुजन वंचित आघाडी आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी करावयाच्या युतीवरुन मोठी रस्सीखेच चालली आहे. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना तर काँग्रेसला एम आय एम आणि मनसेसोबत आघाडी नको आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्यामुळे त्यावरून आंबेडकर यांच्याशी तडजोड करण्यास काँग्रेस इच्छुक नाही. दुसरीकडे, राज ठाकरे यांना भाजप-शिवसेनाविरोधी आघाडीत सामील करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असला तरी उत्तर भारतीयांच्या मतांचे नुकसान सहन करावे लागेल या धास्तीने काँग्रेसची मनसेला आघाडीत घेण्याची तयारी नाही. दिल्लीत आले असताना राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चाही केली होती. पण तरीही काँग्रेस नेते मनसेला सोबत घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार नाहीत.
असे सांगितले जात आहे कि , लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी दिलेल्या निर्देशांवरून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांच्या चारवेळा बैठकी झाल्या. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या बैठकींनंतर काँग्रेस नेत्यांचा आंबेडकर यांच्याविषयी भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेस नेत्यांच्या मतानुसार आंबेडकर यांना आघाडीत येण्याविषयी स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले असून ते दरवेळी नवनव्या अशक्यप्राय अशा अटी घालत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होईल, अशी काँग्रेसच्या नेत्यांना शंभर टक्के खात्री वाटत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपाशी जिंकण्याची क्षमता असलेले प्रत्येकी शंभर उमेदवार आहेत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे १००-११० च्या आसपास दोन्ही पक्ष जागा वाटून घेतील आणि उर्वरित जागा कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी पक्ष, रिपाइंचे कवाडे आणि गवई गट, शेकाप आदी समविचारी पक्षांसाठी सोडतील, असे जागावाटपाचे समीकरण अपेक्षित आहे.