जन आशीर्वाद यात्रा मुक्काम औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांचे मराठा युवा नेते विनोद पाटील यांना शिवसेनेत निमंत्रण , पाटील म्हणाले विचार करून सांगतो

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले असून या दौऱ्यात त्यांनी महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चाय पे चर्चा केली . यामध्ये मराठा समाजातील युवा नेते विनोद पाटील यांच्याशी झालेली चर्चा चारच विषय ठरली आहे . या भेटी दरम्यान आदित्य यांनी विनोद पाटील यांच्याशी बोलताना ‘ किती दिवस ‘बाहेर’ राहता, आमच्यात येऊन जा अशी खुली ऑफर त्यांनी विनोद पाटील यांना दिल्याचे वृत्त आहे. सुमारे अर्धातास त्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी केलेल्या न्यायालयीन लढाईमुळे विनोद पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही त्यांना शिवसेनेची ऑफर होती परंतु शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विनोद पाटील यांची तयारी झालेली नव्हती . आता मात्र पुन्हा थेट आदित्य यांनीच त्यांना हवा दिली आहे.
हडकोतील ताठे मंगल कार्यालयात यात्रेच्या निमित्ताने ते नागरिकांशी संवाद साधण्यापूर्वी आदित्य ठाकरे विनोद पाटील यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे होते. विनोद पाटील यांच्यासोबत अभिजीत देशमुख होते. सुरुवातीला पाच-सात मिनीटे आदित्य ठाकरे यांनी सर्वांसोबत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना बाहेर जाण्यास सांगितले. आदित्य आणि विनोद पाटील यांच्यात सुमारे २५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पाटील यांच्या भेटीला महत्वआले आहे. ‘किती दिवस बाहेर राहता, आमच्या येऊन जा’ अशी खुली ऑफर त्यांनी पाटील यांना दिल्यानंतर एकदम निर्णय घेता येणार नाही, विचार करुन सांगतो असे पाटील ठाकरे यांना म्हणाले. त्यानंतर या दोघांमध्ये मोफत शिक्षणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.