सामूहिक लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेल्या ” त्या ” तरुणीचे अखेर निधन , मुंबई पोलीस निष्क्रिय , कुटुंबीय हतबल

मुंबईत चार नराधमांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या जालन्यातील तरुणीचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अखेर मृत्यू झाला. मुंबईत आपल्या भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार जणांनी गुंगीचं पेय देऊन बलात्कार केल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी औरंगाबादेतील बेगमपुरा पोलिसांना दिली होती मात्र सादर गुन्हा मुंबईत चुना भट्टी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने सदर गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी संबंधित पोलिसांकडे तातडीने वर्ग केला होता. मुंबई पोलिसांची एक टीम अधिक तपासासाठी औरंगाबादला आलीही होती मात्र सदर मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याने तिचा जबाब पोलीसांना घेता आला नाही. त्यामुळे नेमका प्रसंग कसा घडला याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. अखेर पीडितेशी मृत्यूशी चालू असलेली झुंज अशा रीतीने संपली. मृत्यूनंतर तरी पीडितेला न्याय मिळेल का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , जुलै महिन्यात पीडित मुलगी आपल्या भावाकडे मुंबईत आली होती . याच काळात दिनांक ७ जुलै रोजी सदर तरुणीला फोन आल्यामुळे ती मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेली होती . रात्री घरी आल्यानंतर ती घरात कोणाशीही बोलली नाही . दरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिच्या भावाने वडिलांना मुंबईला बोलावून मुलीला गावाकडे जालन्याला पाठवले होते. गावाकडेहीही प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून तिच्या आई -वडिलांनी तिला पुढील उपचारार्थ घाटी रुग्णालयात २७ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणीच्या दरम्यान मुलीच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने बेगमपुरा पोलिसांना याविषयी लेखी कळविले होते .
गुन्ह्याची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून सदर प्रकरण मुंबईच्या चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केले होते. मात्र तपासात समाधानकारक प्रगती झाली नाही. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना संशयितांची नावेही दिली होती . या प्रकरणात तपासाची प्रगती समजून घेण्यासाठी पीडितेच्या भावाने वारंवार चुनाभट्टी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला खरा परंतु पोलिसांनी या बाबतीत कोगतीही सहानुभूतू किंवा तत्परता न दाखवता त्यांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढून दिल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले.
या मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची माहिती सदर तरुणीने आपल्या आई -वडिलांना दिली होती . मात्र तिच्या प्रकृतीत बदल न झाल्याने आणि ती शुद्धीत न आल्याने तिचा प्रत्यक्ष जबाब पोलिसांना घेता आला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान गेल्या दिड महिन्यापासून सदर तरुणी मरणप्राय यातना भोगत होती. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला. तिला सातत्याने झटके येत होते. शुद्धीवर आल्यानंतर ती जोरजोरात ओरडत होती. अत्यंत अमानवी पद्धतीने अत्याचार या मुलीवर करण्यात आले.
पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्याची रहिवासी आहे. पीडित महिलेच्या भावाचे मुंबईतल्या चेंबूर परिसरात वास्तव्य आहे . भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला. घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार घडल्यानंतर घरी काहीच सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. त्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी हा प्रकार अर्धांगवायूचा नसून वेगळं काहीतरी असल्याने तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीला औरंगबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण इथल्या डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं.
त्यानंतर पीडितेने चार जणांनी काहीतरी पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हाच गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनाही अजून आरोपी शोधण्यात यश आलेलं नाही. मरणयातना भोगून या तरुणीने अखेर जगाचा निरोप घेतला. पण या चार नराधमांना शोधण्यात अजूनही पोलीस अपयशी ठरले आहेत.