सावधान : एअर इंडियात कुठलीही भरती चालू नाही , सोशल मीडियावरील जाहिरात फसवी : प्रशासन

एअर इंडियात भरतीअसल्याची खोटी जाहिरात देण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एअर इंडियात एकूण १२० पदे रिक्त आहेत, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. अर्जदाराने ९,८०० रुपये, त्यासोबत जीएसटीही जमा करावा, असा उल्लेखही या जाहिरातीत आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही खोटी जाहिरात देणाऱ्याविरोधात लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
सोशल मीडियावर ही जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. ही जाहिरात वाचून एका व्यक्तीने एअर इंडियाकडे भरतीबाबत विचारणा केली. त्यानंतर सगळेच चक्रावले. याबाबत पडताळणी केली असता ही जाहिरात खोटी असल्याचे स्पष्ट झाले. दोन पानांची ही जाहिरात आहे. त्यात अर्जदाराला रोहन वर्मा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे तसेच ९,८०० रुपये, रीफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट व जीएसटी जमा करण्यासाठी सांगण्यात आले आहे. जाहिरातीत एअर इंडिया इमारत, अकोला, सांताक्रुझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००७ असा खोटा पत्ता देण्यात आला आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. अकोला येथे आमची कोणतीही इमारत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
‘१५० उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात १२० जागा रिक्त आहेत’ असा दिशाभूल करणारा उल्लेखही जाहिरातीत आहे. त्याचा तपशील देत अशा खोट्या जाहिराती देणाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी एअर इंडिया पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.