औरंगाबाद शांतता समितीच्या सभेत रंगली नेत्यांची जुगलबंदी , राजकीय फड चांगलाच रंगला !!

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत गुरुवारी राजकीय फड चांगलाच रंगला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंचावरील सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांची चांगलीच खेचाखेची केली. गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी आणि गणेशभक्तांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही सूचनांचा पाऊस पाडला. मात्र, मनपाचे अधिकारी कामाला ना म्हणत नाही अन् करतही नाही, यांचाही याठिकाणी सत्कार व्हावा असे मत आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त करताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. तर पोलिसच मोठा गुंडा असायला हवा त्यांनीच समाजकंटकांना त्यांची जागा दाखवायला हवी असे मत व्यक्त करण्यात आले. तर नक्षलवादाचे सावट घोंगावत असल्याने जनतेने सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले.
गणेशोत्सव, मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालया तर्फे तापडीया नाट्य रंगमंदिरात दुपारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाठ, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, शहर गणेश महासंघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अॅड. माधुरी देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे याशिवाय गणेश महासंघाचे अध्यक्ष अक्षय पोलकर, बबन डिडोरे, विकास घाटे आणि माजी नगरसेवक अनिल मकरिये यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी केले. या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिका-यांसह राजकीय नेत्यांनी रस्त्याची खड्डे बुजविणे, एक्स्ट्रा स्ट्रिट लाईट बसविणे, महावितरण आणि टेलिफोनच्या खाली लोंबकळणा-या तारा, महिलांच्या सुरक्षेसाठी मदत केंद्र, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, सीसी टिव्ही कॅमेरे बसवणे, वाहतुकीची कोंडी फोडणे, सोशल मिडीयामुळे उद्भवणारी सामाजिक तेढ याशिवाय नशेखोरांना आळा घालण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ‘आचारसंहिता दक्ष नागरिक’ या पुस्तकाचे देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
………
महासंघाची पूरग्रस्तांना धान्याची मदत- राजेंद्र जंजाळ
आचारसंहिता म्हणताच राजकारण्यांना घाम फुटतो. त्याप्रमाणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आचारसंहिता दक्ष नागरिक या पुस्तकामुळे गणेशभक्तांना गणेशोत्सवात नेमकी काय काळजी घ्यायची याची माहिती मिळेल. कोल्हापुर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना शहर गणेश महासंघाच्या वतीने धान्याचे दहा ट्रक पाठविले जाणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांसाठी टोकन पध्दत अंमलात आणावी. सीसी टिव्ही अंतर्गत असलेल्या गणेश मंडळाला यंदा २१ हजारांचे बक्षीस देणार असल्याचेही जंजाळ म्हणाले.
……..
वाघाची संख्या घटल्याने मोकाट वाढले…….
मोहर्रम समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर रशीद मामू यांनी मत व्यक्त करताना मोकाट जनावरे आणि कुत्र्यांना आळा घालावा, तसेच नशेखोरांवर कारवाई करावी असे म्हटले होते. यावर गणेश महासंघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी मत व्यक्त करत वाघाची संख्या कमी होत आहे. तर मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याचे म्हटले. यामुळे सभागृहातील उपस्थित काही काळ अवाक् झाले होते.
…..
बंद पाकिटातून मदत करा – जगन्नाथ काळे
गणेशोत्सवा संदर्भात सूचना मांडताना व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे म्हणाले की, पूरग्रस्तांना भरभरुन मदत करावी. सध्या व्यापा-यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे व्यापा-यांकडून होईल तेवढीच मदत घ्यावी. नाही तरी विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या देखील मोठी असणार आहे. त्यांनी बंद पाकिटातून गणेशोत्सवाच्या काळात मदत करायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.
……
जैस्वालांना खैरेंचा घरचा आहेर….
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वावरणा-यांना आळा घालावा. बाहेरचे नागरिक गुलमंडीवर येऊन मध्यरात्री तासन्तास गप्पा मारत बसतात. त्यांना आता स्थानिकांनीच हिसका दाखवायला हवा असे मत माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी व्यक्त केले होते. त्यावर घरचा आहेर देत खैरे म्हणाले असे नागरिक गुलमंडीवर येत नाही ते निराला बाजारात आले असतील.