शरद पवारांचे घड्याळ सोडून आमदार दिलीप सोपल यांनी जाहीर केला शिवबंधन बांधण्याचा निर्धार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सोमवारी सकाळी जाहीर केले. सोपल हे उद्या, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल शिवबंधन बांधून घेणार आहेत.
‘शिवसेनेत प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा असल्याने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणूक शिवसेनेकडून लढविणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप की आणखी कोणी या जर तरच्या चर्चा मी करणार नाही. शिवसेनेकडून निवडणूक लढवायची आहे, हेच मला कळते,’ असे दिलीप सोपल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ‘सोपल आमच्या बरोबर आहेत,’ असे खुद्द पवार यांनी मध्यंतरी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोपल यांनी पक्षांतराचा अंदाज घेतला होता. कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने सोपल यांनी शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला.