G-7 : जम्मू -काश्मीर प्रश्न व्दिपक्षीय , मध्यस्थीची गरज नाही , मोदींनी ट्रम्प यांना समजावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळया मुद्दांवर चर्चा केली. काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मोदींनी यावेळी ट्रम्प यांना सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.
काश्मीरसह सर्व विषय भारत-पाकिस्तानमधले दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्दावर मध्यस्थी करण्याची वारंवार तयारी दाखवत होते. पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
मोदी म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्दे आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना मी फोन करून शुभेच्छा देताना सांगितले होते की पाकिस्तानला आरोग्य, गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर लढायला हवं. दोन्ही देश मिळून याविरोधात लढूया. दोन्ही देश जनतेच्या भलाईसाठी काम करतील.’
काश्मीर मुद्दावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करुन नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. पण ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दावर आजे जे सांगितलो तो एकप्रकारे भारताचा राजनैतिक विजय आहे. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्दे केल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विजयी झाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आपण गरीबीविरोधात लढले पाहिजे हे बोललो होते असे नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.
सात विकसित श्रीमंत देशांच्या या जी-७ समुहात भारत विशेष आमंत्रित सदस्य आहे. जी-७ समुहात फ्रान्स, जर्मनी, युके, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जापान या राष्ट्रांचा समावेश आहे.