तीन तलाकच्या निर्णयामुळे नरेंद्र मोदींचा समाजसुधारकांमध्ये समावेश : अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी तीन तलाकवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. व्होट बँकेसाठी तीन तलाक विधेयकाला काँग्रेसने विरोध केला असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क मिळाला असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सराकरच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आल्याने त्यांचा समाजसुधारकांमध्ये समावेश झाला असल्याचेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
काँग्रेसने तुष्टीकरणासाठी या विधेयकास विरोध केल्याचे सांगत, गृहमंत्री शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात २५ पेक्षा जास्त ऐतिहासीक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले आहे. ही मोदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. तीन तलाक संपुष्टात आणने केवळ मुस्लीम समाजाच्या फायद्याचे आहे. एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेनुसार, देशातील ९२ टक्के मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्ती हवी होती.
आज जर आम्ही हे विधेयक मांडले नसते तर जगासमोर भारतीय लोकशाहीवरील हा एक ठपका असला असता. यासाठी मुस्लीम भगीनींनी मोठा लढा दिला. शाह बानोला तीन तलाक दिला गेला तर त्यांनी आपली लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. काही पक्षांना त्यांच्या व्होट बँकेची चिंता होती यासाठी त्यांनी या विधेयकास विरोध केला. तर संसदेत विरोध दर्शवला मात्र त्यांना माहिती होते की हा अन्याय आहे, ज्याला संपुष्टात आणने आवश्यक आहे. मात्र तरी देखील त्यांच्याकडे सरकारच्या निर्णयाला पाठींबा देण्याचे धैर्य नव्हते. तसेच, तिहेरी तलाकची प्रथा ही मुस्लीम महिलांसोबत अन्याय करणारी प्रथा होती. महिलांना अधिकारापासून रोखणारी प्रथा होती. समानतेपासून दूर ठेवणारी प्रथा होती तिहेरी तलाकविरोधातील हा कायदा आणून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही हे आम्हालाही माहित आहे व जे या कायद्याचा विरोध करत आहेत. त्यांनाही माहित आहे असेही ते म्हणाले.