पाकच्या गोळीबारला भारतीय लष्ककरांचे सडेतोड प्रत्युत्तर

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयानंतर पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात सातत्याने तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादी घुसवण्यासह शस्त्रसंधी उधळून लावली जात आहे. शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे. पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता. पाकच्या गोळीबारला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. सीमेलगतची पाकिस्तानी लष्कराची चौकी भारताने उडवली. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली.
यापूर्वी भारतीय स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने गोळीबार केला होता. कृष्णा घाटी सेक्टरमधील सीमेनजीक असलेल्या गावांना पाक लष्कराकडून निशाणा बनवण्यात आले होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले असून दोन्ही देशातील व्यापाराबरोबर रेल्वे आणि बससेवाही बंद केली आहे. तसेच भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांना माघारी पाठवले असून काश्मीरसाठी संग्राम करण्याच्या धमक्या पाककडून सुरूच आहेत.