माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती नाजूक

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती नाजूक झाली आहे. जेटली यांना गेल्या काही दिवसापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेटली यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवून ईसीएमओ म्हणजे एक्सट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सीजिनेशन वर शिफ्ट केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
भाजपजे नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अनेक नेत्यांची ये-जा सुरू आहे. शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतली होती. आज संध्याकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पुन्हा एकदा जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज संध्याकाळी रुग्णालयात येणार असल्याचे समजते.
याआधी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम्समध्ये अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जेटलींच्या कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेतली होती. प्रकृती बिघडल्यामुळे जेटली यांनी 9 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 66 वर्षीय जेटली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जेटली यांनी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. अर्थात त्यानंतर जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याचे अथवा अन्य माहिती देणारे कोणतेही मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले नाही. प्रकृती ठिक नसल्याने जेटली यांनी 2019ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. गेल्या वर्षी 14 मे रोजी मूत्रपिंडवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हा रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार पाहिला होता. जेटलींना मधुमेहाचा देखील त्रास आहे. त्यामुळे त्यांचे वजन देखील वाढत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सप्टेंबर 2014मध्ये त्यांच्यावर बेरियाट्रिक सर्जरी करण्यात आली होती.