Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट जारी

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक पाऊल भारताने उचलल्यानंतर काश्मीरमधील शांतता बिघडवण्यासाठी दहशतवादी गटांना हाताशी धरून पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकतं, असे इनपुट्स हाती आल्याने लष्कर, हवाईदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवतानाच राज्याचे पुनर्गठन करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयानंतर हिंसाचारग्रस्त काश्मीरमधील वातावरण वेगाने बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील हिंसाचार पूर्णपणे थांबला आहे. हेच पाकच्या अस्वस्थतेचे कारण बनले असून एकीकडे याप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेणाऱ्या पाकने काश्मीरमध्ये अशांतता माजवण्याचेही छुपे कारस्थान रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळेच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. पाक सैन्याकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. त्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. गेल्या २४ तासांत भारतीय जवानांनी पाकच्या ४ सैनिकांना कंठस्नान घातले आहे. मंगळवारी रात्री पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तो भारतीय जवानांनी हाणून पाडला.