Maharashtra : कोल्हापूर , सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ७ कोटींसह जिवनावश्यक वस्तूंचे वाटप : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून शासनाने आपणास जे अधिकार दिले आहेत, त्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून, आवश्यकतेप्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यांतील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून, उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. पुरामुळे आतापर्यंत पुणे विभागात ५१ जण मृत्युमुखी पडले असून, ४ जण बेपत्ता आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक २४ तर कोल्हापूर जिल्ह्यातील १० जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. सातारा जिल्हा व पुणे जिल्हा प्रत्येकी ८ जण तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बेपत्तांमध्ये सांगलीतील एक, कोल्हापूमधील दोन व पुण्यातील एकाचा समावेश आहे.
रस्त्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
बँकीग सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरू झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच तातडीने हाती घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र, ३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पूर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र, २ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी
मुख्यमंत्री सहायता निधीकरिता पुणे विभागातील आयुक्त कार्यालयात आतापर्यंत ६ लाख २५ हजार इतक्या रकमेचे धनादेश विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, दूधपावडर आदी जीवनावश्यक साहित्य व वस्तू स्वरूपात प्राप्त होत असून, आजमितीला सांगलीसाठी ४३ तर कोल्हापूरसाठी ४० ट्रक असे एकूण ८३ ट्रकद्वारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहे. सध्या औषध व उपचाराची आवश्यकता पाहून मोठ्या संख्येने वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात १७४, कोल्हापूर जिल्ह्यात १६९ तर सातारा जिल्ह्यात ७२ अशी एकूण ४१५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
घराच्या पडझडीच्याबाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून, प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्ह्यात पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ११ असून १ हजार ८२९ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५८८ पूर्णत: तर ९ हजार ४१३ अंशत: घरांची पडझड झाली आहे. शिवाय ३२७ गोठ्यांची पडझड झाली आहे.
पुणे जिल्ह्यात १७ लाख ५० हजार रुपये ३५० ग्रामीण भागातील कुटुंबांना, सातारा जिल्ह्यातील ५६६ ग्रामीण कुटुंबांना, २८ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ३९८ ग्रामीण भागातील कुटुंबांना १९ लाख ९० हजार रुपयांचे ५ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ३३५ तर शहरी भागातील २ हजार २३३ कुटुंबांना ४ कोटी २८ लाख ४० हजार रूपयांचे ५ हजार प्रमाणे वाटप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग ४ हजार १३० तर शहरी भागातील २८७ कुटुंबांना २ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मदतीच्या वाटपाचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.