Aurangabad : पोलीस आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांना ३ लाखांचे तर ग्रामीण पोलिसांतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे महापुराने जनजीवन विस्कळीत केल्यानंतर महापुराच्या विळख्यातून पूरग्रस्तांची सुटका करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्र पोलिस अहोरात्र प्रयत्न करीत असतानाच , औरंगाबाद पोलिस आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी तीन लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत आज स्वातंत्र्यदिनी करण्यात आली . पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वेच्छेने हि मदत जमा करून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सदर रक्कम आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सुपूर्द करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांनी हि माहिती दिली आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचीही मदत
दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल, औरंगाबाद परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनानुसार मोक्षदा पाटील , जिल्हा पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्या पुढाकाराने औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्ण परिस्थितीतील पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला. या मुदतीमध्ये गहू ,तांदूळ, डाळी , बिस्किट, चिवडा, चादरी ब्लॅंकेट, औषधी, तसेच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता वॉटर प्युरिफायर इत्यादी साहित्य करून पोलीस मुख्यालय औरंगाबाद ग्रामीण येथे जमा करण्यात आले आणि आज स्वातंत्र्यदिनी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल औरंगाबाद परिक्षेत्र आणि मोक्षदा पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्या उपस्थितीत सदर साहित्याचे ट्रक कोल्हापूर , सांगलीकडे रवाना करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे , पोलीस उपाधीक्षक विवेक सराफ , पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद , पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव , जिल्हा वाहतूक शाखा, राखीव पोलीस निरीक्षक निर्मळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि इतर अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान आज स्वातंत्र्यदिनीच रक्षा बंधन असल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यामुळे सुटीवर जात आले नाही त्यांच्यासाठी ग्रामीण पोलीस कार्यालयात आज सामूहिक रक्षा बंधन सोहळाही साजरा करण्यात आला.