Aurangabad Crime : चाकुचा धाक दाखवून व्यापा-याला लुटणा-या चार तरुणांना अटक

अपघाताचा बनाव करून व्यापा-याला चाकुचा धाक दाखवून लुटणा-या चौघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाआड केले. पोलिसांनी अटक केलेले चारही तरूण शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेतात. या सुशिक्षीत तरुणांनी पहिल्यांदाच लुटमार केली. अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले.
यासंदर्भात शुक्रवारी पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. पंकज लोटन पाटील (२१), प्रेम उर्फ निखील अशोक साळवे (२०), कृष्णा उर्फ किशोर उत्तमराव लोखंडे (२५, तिघेही रा. कैलासनगर) आणि अरविंद सुभाष सपाटे (२८, रा. सिडको, एन-६) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.
सिडको, एन-४ च्या कामगार चौकातील शिवशक्ती सिरॅमिक टाईल्स दुकानाचे मालक कृष्णा हरजीत चांबरीया (१९, रा. पिसादेवी रोड) हे १४ आॅगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून कारने (एमएच-२०-डीजे-८४८७) घराकडे जात होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील हनुमान चौकात दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी कारला उजव्या बाजूने धडक दिली. यावेळी अपघात झाल्याचा बनाव करत आमची दुचाकी दुरूस्त करून द्या अशी चौघांनी मागणी केली. त्यामुळे घाबरुन गेलेल्या चांबरिया यांनी आपल्या ओळखीच्या गॅरेज चालकाकडे जाऊ तेथे दुचाकी दुरूस्त करुन घेऊ असे सांगितले. मात्र, चौघापैकी एक जण कारमध्ये बसला. त्याने कृष्णा चांबरीया यांना तुम्ही आमच्या गॅरेजवाल्याकडे चला म्हणत नगरसेवक सतीश नागरे यांच्या घरासमोर नेले. तेथे चाकुचा धाक दाखवून कारच्या पाठीमागील सीटवरील तीन लाख रुपए ठेवलेली बॅग घेऊन चौघेही दुचाकीवरुन पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर चांबरिया यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, नितेश जाधव, दीपक जाधव, गणेश डोईफोडे आणि माया उगले यांनी तांत्रिकदृष्ट्या शोध घेऊन चौघांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्या घरझडतीतून पोलिसांनी तीन लाखांपैकी एक लाख ७९ हजार रुपयांची रोख, चाकु, दोन दुचाकी, चार मोबाईल असा ऐवज जप्त केला.
…..
दारूच्या नशेत केली लुटमारी……
व्यापा-याला लुटण्यासाठी त्यांनी एका कामगाराला हाताशी धरले होते. त्याच्या सांगण्यानुसार, चौघांनी सुरुवातीला मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांनी लुटमारीचा प्रकार केला. त्यांच्यापैकी दोघे देवगिरी महाविद्यालयात तर एक जण विवेकानंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच चौथा चौका येथील कोहीनुर महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.
………