शिकला सावरला , मोठा झाला , अमेरिकेतही गेला पण वंशाच्या दिव्यावरून पत्नीला छळू लागला, अखेर पत्नीची पोलिसात धाव !!

उच्चशिक्षित कुटुंबातील मुलगा आणि सून अमेरिकेत नोकरीला. दोघांनाही चांगला पगार. मात्र, मुलगा होत नाही म्हणून अमेरिकेत नोकरी करणाऱ्या सुनेचा नवरा आणि सासू सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. ‘लग्नात माहेरच्या मंडळींनी कमी खर्च केला, तुझा संपूर्ण पगार घरी द्यायचा. आम्हाला मुलगाच हवा,’ यासाठी नवरा आणि सासूसासऱ्यांनी तब्बल १० वर्षे सुनेचा छळ केल्याचे उघड झाले आहे. १२ डिसेंबर २००८ ते १३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत अमेरिका, पुणे आणि सासरी म्हणजेच जालन्याला या सुनेचा छळ करण्यात आला. शेवटी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळलेल्या महिलेने थेट सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी ३८ वर्षांच्या विवाहितेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राहुल देविदास घोडतुरे (वय ४०), सासू कावेरी देविदास घोडतुरे, सासरे देविदास कडप्पा घोडतुरे (सर्व रा. मंठा रोड, जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त अमेरिकेत राहतात. दोघेही अमेरिकेत नोकरी करतात. पीडित महिला अमेरिकेत सरकारी नोकरी करते. त्यांना सात वर्षांची एक मुलगी आहे. मात्र, वंशाला दिवा असला पाहिजे, यासाठी काही वर्षांपासून सासरच्या मंडळींना सुनेचा छळ करण्यास सुरुवात केली. पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असतानाही या कारणासाठीच सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात येत होती. अमेरिकेत नोकरीसाठी गेल्यावर नवऱ्याकडून शिवीगाळ व मारहाण होऊ लागली. अमेरिकेत पाच वर्षे नवऱ्याने पत्नीचा छळ केला. संपूर्ण पगार मला द्यायचा, असा आग्रह करून नवरा पत्नीचे सर्व पगार काढून घेत असे. जून महिन्यात नवऱ्याने पत्नीला नोकरी सोडायला लावून थेट भारतात हाकलून दिले. त्यामुळे पत्नीने मंगळवारी (१३ ऑगस्ट) सासरच्या लोकांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेचा नवरा, सासू-सासरे यांचा शोध पोलिस घेत आहेत.