“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे बाटलीतून बाहेर आलेला राक्षस” : इम्रानखानच्या भाषणात संघाच्या हिंदुत्ववादावर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे बाटलीतून बाहेर आलेला राक्षस आहे. हा फक्त मुस्लीम समाजालाच नाही तर सगळ्यांनाच त्रास देणार यात काहीही शंका नाही अशी जहरी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांनी आज हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी एक भाषण केले. या भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नथुराम गोडसे, भाजपा, नरेंद्र मोदी या सगळ्यांवरच निशाणा साधला. मुस्लीम धर्माला हे लोक तुच्छ मानतात.
हिंदू राष्ट्र झालं पाहिजे ही यांची भूमिका आहे. याच विचारधारेच्या माणसानेच महात्मा गांधींची हत्या केली असाही आरोप इम्रान खान यांनी केला. मुस्लीम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांनाच ही विचारधारा त्रास देणारी आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचं कार्ड जे नरेंद्र मोदी खेळले आहेत त्यांची ही चाल त्यांना चांगलीच महागात पडणार आहे. आरएसएसची विचारधारा ही जगाला ठाऊक नाही, पाकिस्तान ही नेमकी काय विचारधारा आहे ती जगासमोर आणणार आहे असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. महाभयंकर अशी ही विचारधारा आहे, यांची विचारधारा तिरस्काराने भरलेली आहे. या मानसिकतेच्या, विचारधारेच्या लोकांनी जगभरात अनेक हत्या केल्या आहेत, रक्तपात केले आहेत. सहिष्णू देश अशी भारताची ओळख होती. आता मात्र या ठिकाणी गोमांसावरुन मारहाणीच्या घटना घडताना दिसतात. संघाच्या विचारधारेमुळे सर्वात मोठे नुकसान देशाचे होणार आहे.
हिंदूही विचारधारेला घाबरतात. विरोधकांची गळचेपी त्यांनी सुरु केली आहे. मुस्लीम समाज, ख्रिश्चन समाज यांचे अधिकार या विचारधारेच्या लोकांनी काढून घेतले आहेत. बुद्धीवादी लोक संघ विचारधारेला घाबरतात. एका खूप मोठ्या अधोगतीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. मी जेव्हा क्रिकेट खेळायला भारतात जायचो तेव्हा तिथले अनेक मुस्लीम बांधव मला सांगत की आपण सगळे एकच देश असतो तर खूप चांगले झाले असते. आज त्यांची भूमिका बदलली आहे. मोहम्मद अली जीना यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच होता असे आता ते म्हणू लागले आहेत. भारतात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. कोणीही यांच्या विरोधात बोलले की त्याला देशद्रोही ठरवले जाते. एखादा मुस्लीम त्याच्या हक्कांबाबत बोलू लागला की पाकिस्तानात जा असे सांगितले जाते. भारताचे हे रुप आणि ही ओळख फक्त संघामुळे होते आहे असाही आरोप इम्रान खान यांनी केला आहे.