लाल किल्ल्यावरून : वाढत्या लोकसंख्येबद्दल मोदींनी व्यक्त केली चिंता

छोटे कुटुंब ठेवणं ही सुद्धा एकाप्रकारची देशभक्ती आहे. ज्या लोकांची कुटुंब छोटी आहेत त्यांचा सन्मान करायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या भाषणात व्यक्त केलं आहे. तसंच लोकसंख्येची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करायला हवेत असं मतही मोदींनी व्यक्त केलं आहे.
मोदींनी ७३व्या स्वातंत्र्य दिनी वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणाखाली आणण्यासाठी मदत करा अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे. ‘भारतात होणारी अपरिमित लोकसंख्या वाढ येणाऱ्या पिढ्यांसाठी अनेक समस्या निर्माण करते आहे. या देशातील एक घटकाला या समस्येची जाणीवही आहे. त्यामुळे मूल जन्माला घालण्याआधी ते सारासार विचार करतात.’ मुलांना जन्म देण्याआधी त्यांच्या गरजांचा विचार करायला हवा असंही त्यांनी सांगितलं.
‘आत्मप्रेरणेने जर तुम्ही कुटुंबनियंत्रण केलं तर तुम्ही फक्त स्वत:च नाही तर देशाचंही भलं कराल. ही पण एकाप्रकारची देशभक्तीच आहे’. याशिवाय भ्रष्टाचार ,वशिलेबाजी या गोष्टी कमी व्हायला हव्यात अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.