चर्चेतला बातमी : आम आदमी पार्टीही वंचित बहुजन आघाडी सोबत मैदानात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले असून, प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवेसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीसोबत आम आदमी पार्टी जाण्याची शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविल्या होत्या. त्यात आलेल्या दारुण अपयशानंतर राज्यातील कोणत्याही निवडणुका आम आदमी पार्टीने लढविल्या नव्हत्या.
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आम आदमी पार्टीने निर्णय घेतला असून, वंचित बहुजन आघाडीशी युती करुन निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार देण्याचा आम आदमी पार्टीचा इरादा आहे. आम आदमी पार्टीचे राज्यातील नेते ब्रिगेडीअर सुधीर सावंत आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता नसल्याची चर्चा होत असून त्यामुळेच आम आदमी पार्टीने वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.