वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले पूरग्रस्त ब्रह्मनाळ

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पूरग्रस्त ब्रह्मनाळ हे गाव दत्तक घेतले आहे. ब्रह्मनाळमधील गावकरी पुरातून सुटका करण्यासाठी बोटीने जात असताना ही बोट उलटली होती. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. ब्रह्मनाळ हे ग्रामपंचायतीच गाव असून गावात 700 कुटूंब राहतात.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणाऱ्या पुनर्वसानासाठी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.
दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून ओघ सुरू आहे. गेल्या 4 दिवसांत पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीत तब्बल साडेआठ कोटींचा निधी जमा झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालीही पूरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन करण्यात आली आहे.