Aurangabad : घाटीचा मेडिसीन विभाग चकाचक, इतर विभागात दुर्गंधी कायम, स्वच्छता स्पर्धेत ठरावीक विभागालाच पसंती

औरंंंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त घाटी रूग्णालय प्रशासनाच्या वतीने स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी घाटी रूग्णालयाच्या मेडिसीन विभागातील अनेक वॉर्ड चकाचक करण्यात आले आहेत. परंतु ओपीडी विभाग आणि अपघात विभागात दुर्गंधी कायम असल्याचे दिसून येत आहे. घाटी प्रशासनाने आयोजित केलेली स्वच्छता स्पर्धा ही फक्त एका विभागापुरतीच मर्यादीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
येत्या गुरूवारी भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमीत्ताने घाटी रूग्णालय प्रशासनाने विविध वॉर्डासाठी स्वच्छता स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देवून गौरविण्यात येणार असल्याचे घाटी प्रशासनाने जाहिर केले आहे. स्वच्छता स्पर्धत भाग घेण्यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसापासून घाटी रूग्णालयाच्या मेडिसीन विभागातील विविध वॉर्डात स्वच्छता करण्यात आली असून पडदे आदी लावून सजविण्यात आले आहे.
घाटी रूग्णालयात मेडिसीन विभागासोबतच अपघात विभाग आणि बाह्यरूग्ण विभागात दररोज हजारो रूग्ण येत असतात. मेडिसीन विभाग चकाचक करण्यात आला असला तरी घाटीच्या इतर विभागात दुर्गंधी कायम असल्याचे दिसून येत आहे. अपघात विभागातील अनेक वॉर्डात असलेल्या फरश्या (टाईल्स) तुटल्या आहेत. तर ओपीडी विभागात जागोजागी पान आणि गुटखा खाणाNयांच्या पिचकाNयांनी भिंती रंगल्या आहेत.