Rajstan : मित्रांसोबत निघालेल्या गरोदर महिलेवर सामुहीक अत्याचार, चौघांना अटक तर मित्राची आत्महत्या

राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेवर 5 नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या तीन मित्रांना अटक केलीय. या घटनेमुळे त्या महिलेचा गर्भपात झाला तर तिच्या मित्राने आत्महत्या केलीय.
राजस्थानातल्या बांसवाडा इथली ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलैला रात्री पीडित महिला आपल्या मित्रासोबत गावाला जात होती. त्यावेळी नशेत असलेल्या आरोपींनी महिलेच्या मित्रासोबत भांडण केलं. त्याच्यावर तलवारीने हल्लाही केला. या हल्ल्यात तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेला उदयपूरा इथल्या बस स्टँडवरून एका अज्ञात स्थळी नेलं आणि बलात्कार केला.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मित्रांनाही बोलावून घेतलं. आणि या पाच मित्रांनी मिळून तिच्यावर 11 वेळा बलात्कार केला आणि एका निर्जन स्थळी सोडून दिलं. या अत्याचाराने गंभीर धक्का बसलेल्या या तरुणीला नंतर काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यावेळी तिचा गर्भपात झाला होता. तर प्रचंड धक्का बसलेल्या तिच्या मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुनील चरपोटा आणि त्याचे तीन मित्र विकास, गब्बू आणि कलजी याला अटक केलीय. यातला सुनील हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर पाच हजारांचं इनामही आहे.आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. तर राजस्थानच्या महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली असून पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.