तातडीची मदत म्हणून पूरग्रस्तांना प्रति कुटुंब पाच हजार रुपये : मुख्यमंत्री

पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील नागरिकांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये रोख रक्कम तातडीची मदत म्हणून देण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीची उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
या आढावा बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर यावेळी उपस्थित होते. पूरग्रस्तांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शासकीय, निमशासकीय, खासगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूरग्रस्त कुटुंबांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.