Kolhapur : मोबाइल चार्जिंग करण्यासाठी गेलेल्या तिघांना भरधाव ट्रकने चिरडले !!

अतिवृष्टीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाइल चार्जिंग करण्यासाठी गेलेल्या तिघांना भरधाव ट्रकने चिरडले. तिघांचा जागीच मृत्यू झाला. शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अमर वसंत कदम (18), दीपक मारुती कदम (18) आणि अजय कृष्णा बिळासकर (19) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही शाहुवाडी तालुक्यातील अमेणी येथील रहिवासी होते. तिघे दुचाकीवरून मलकापूरला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी निघाले होते.
मिळालेली माहिती अशी की, अतिवृष्टीमुळे गावात वीज पुरवठा खंडित असल्याने मोबाइल चार्जिंग करण्यासाठी अमर, दीपक आणि अजय हे तिघेही गुरुवारी दुपारी मलकापूरला निघाले होते. यावेळी यावेळी बांबू भरून कराडकडे निघालेला ट्रक आणि त्यांच्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मलकापुरातील श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजचे तिघेही विद्यार्थी होते. दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गुरुवारी रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून कोयना धरणातूनही पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कोल्हापूर सांगलीमधील पूरपरिस्थिती पुन्हा बिकट होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महाप्रलय निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 112 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फुटांपर्यंत पोचली आहे. जिल्ह्यात आर्मी, नेव्ही NDRF दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.