खबळजनक : मुलीची हत्या करून आईची आत्महत्या , ठाण्यात हळहळ

हृदय पिळटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. आईने पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. प्रज्ञा पारकर आणि श्रुती पारकर अशी मृत मायलेकीची नावे आहेत. ठाण्याच्या कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर या मायलेकी राहत होत्या. दोघींचे मृतदेह कळव्यातील प्रमिला रुग्णालयात नेले असून घटनास्थळी कळवा पोलिस पोहोचले आहेत.
श्रुतीचे वडील प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी श्रुती तर गळफास लावलेल्या अवस्ठेत पत्नी प्रज्ञा दिसली. घरातील भयावह चित्र पाहून प्रशांत यांना धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. माहिती मिळताच कळवा पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, प्रज्ञाने आपल्या पोटची 17 वर्षीय मुलगी श्रुतीची हत्या का केली आणि स्वत:ही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेने कळव्यासह ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.