काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मुकुल वासनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत असल्याची चर्चा

महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातील माजी खासदार यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मुकुल वासनिक यांच्या रूपाने मागास नेत्याला काँग्रेसचं नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या निर्णयावर उद्या (शनिवारी) होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस अध्यक्षपदाबाबत गोंधळाचे वातावरण आहे. राहुल गांधी अध्यक्षपदी राहण्यास तयार नसतील तर प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवावे, अशी मागणीही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि शशी थरूर यांनी केली होती. मात्र, या चर्चा आता मागे पडल्या असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत ५९ वर्षीय मुकुल वासनिक यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे वृत्त हाती आले आहे. अध्यक्षपदासाठी वासनिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून शनिवारी दिल्लीत होत असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
ए. के. अँटनी, अहमद पटेल आणि के. व्ही. वेणुगोपाल या वरिष्ठ नेत्यांनी आज यूपीए अध्यक्षा व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायला हवी, असा आग्रह या नेत्यांनी धरला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या १३४ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पक्षाचं नेतृत्व नेहरू-गांधी परिवारातील सदस्याकडेच राहिलेलं आहे.