Jammu & Kashmir Article 370: संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानची मध्यस्थीची मागणी नाकारली

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. या प्रकरणी पाकिस्तानने अन्य देशांच्या मदतीचीही मागणी केली होती. परंतु पाकिस्तान एकाकी पडला होता. तसेच पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये हे प्रकरण नेले होते. परंतु संयुक्त राष्ट्रानेही पाकिस्तानच्या मध्यस्थीची मागणी नाकारली आहे. यावेळी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1972 मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने गुतारेस यांच्या मध्यस्थीची मागणी पाकिस्तानने केली होती. त्यानंतर गुतारेस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. जम्मू काश्मीरमधील स्थितीकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणी संयम ठेवण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1972 मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. यामध्ये जम्मू काश्मीरमधील स्थितीवर संयुक्त राष्ट्रानुसार शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढला जाईल, असं नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले.
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे. त्यात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बिघडेल असे कोणतीही पावले उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांना काश्मीरचा मुद्दा सुरक्षा परिषदेत नेण्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून मिळालेले पत्र त्यांच्या विनंतीवरू सुरक्षा परिषदेकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.