Jammu & Kashmir : राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० प्रकरणी पाकची तीव्र प्रतिक्रिया, भारतीय उच्चायुक्तांना देशात परतण्याच्या सूचना

जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. पाकने भारताबरोबरचा द्विपक्षीय व्यापार बंद केला असून, राजनैतिक संबंधांचा स्तर घटवण्याचा निर्णय पाकिस्तानकडून घेण्यात आला आहे. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत जाण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, भारतामध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त नाहीत. या महिन्यात नव्या उच्चायुक्तांची नियुक्ती पाकिस्तानकडून करण्यात येणार होती. मात्र, आता पाकिस्तानातून कोणताही उच्चायुक्त भारतात येणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत पाच निर्णय घेण्यात आले. भारताबरोबरचा राजनैतिक संबंधांचा स्तर घटवणे, भारतासोबतचा व्यापार बंद करणे, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध आणि करार यांचा आढावा घेणे; त्यावर पुनर्विचार करणे, भारताकडून घेण्यात आलेला निर्णय संयुक्त राष्ट्रांसमोर मांडणे; त्याचप्रमाणे हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करणे, तसेच काश्मिरींशी असलेली एकात्मता दर्शवण्यासाठी १५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करून देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवल्यानंतर पाकिस्तान वारंवार प्रक्षोभक वक्तव्ये करत आहे. भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने संसदेचे विशेष सत्र बोलावले होते. यावेळी भारतावर पुलवामासारखे हल्ले होऊ शकतात, अशी दर्पोक्ती पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केली होती. भारताविरुद्ध युद्धाचा विचार पाकिस्तानने करायला हवा. पाकिस्तानने अपमान किंवा युद्ध यांच्यापैकी एकाची निवड करावी. भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय संबंध तोडून टाकावेत, अशी मागणी पाक सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत केली.