भाजपच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज पंचतत्वात विलीन , कन्या बांसुरीने दिला अग्नी

अमोघ वक्तृत्वाच्या धनी, भारतीय राजकारणातील कणखर महिला नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या जडणघडणीतील रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज आज पंचत्वात विलीन झाल्या. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत सुषमा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी बासुरी यांनी सुषमा यांना मुखाग्नी दिला. सुषमा या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सुषमा यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
सुषमा यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपा नेते मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह विदेशातीलही विविध मान्यवरांनी सुषमा यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. रात्रीच त्यांचे पार्थिव एम्समधून जनपथावरील धवन दीप येथील निवासस्थानी नेण्यात आले. रात्रीपासूनच सुषमा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. आज दुपारी सुषमा यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात आलं. तिथे विविध मान्यवरांसह हजारो कार्यकर्त्यांनी सुषमा यांचं अंत्यदर्शन घेतलं. ‘जब तक सूरज चांद रहेगा, दीदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी वातावरण अधिकच भावुक बनलं. तिथून अत्यंत शोकाकुल वातावरणात सुषमा यांची अंत्ययात्रा निघाली आणि लोधी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका तेजस्वी नेतृत्वाचा अस्त झाला आहे. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सुषमा यांच्याबद्दल सर्वांनाच आदर होता. भारतीय राजकारणातील एक कणखर महिला नेत्या अशी त्यांची ओळख होती. त्यामुळेच सुषमा यांची अकाली एक्झिट चटका लावून गेली आहे.