Ayodhya Case : सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात, वादग्रस्त जागेवर मुस्लिमांना १९३४ पासून मज्जाव-निर्मोही आखाडा

अयोध्या आणि बाबरी मशिद वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे. या दरम्यान निर्मोही आखाड्याच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद कोर्टात सादर केला. १९३४ पासून वादग्रस्त जागेवर जाण्यास मुस्लिमांना मज्जाव करण्यात आला आहे असं निर्मोही आखाड्याचे वकील सुशील कुमार जैन यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करतं आहे.
प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी या दिवशी सुनावणी घेतली जाणार आहे. निर्मोही आखाड्याचे वकील सुशील कुमार जैन यांनी कोर्टात बाजू मांडली. त्यांनी नकाशा दाखवत सांगितलं की, या वादग्रस्त जागेवर आमचाच कब्जा होता. दुसऱ्यानी ही जमीन धाक दाखवून बळाच्या जोरावर आमच्याकडून जमिनीवर कब्जा केला असंही जैन यांनी म्हटलं आहे.
आपले म्हणणे मांडताना सुशील जैन यांनी जुन्या निर्णयांची उदाहरणे दिली. ज्या ठिकाणी नमाज अदा होत नाही त्या ठिकाणाला मशिद म्हणत नाहीत. १९३४ पासून वादग्रस्त जागेवर पाचवेळा नमाज अदा करणं बंद झालं आहे. तर १६ डिसेंबर १९४९ पासून या ठिकाणी शुक्रवारीही नमाज अदा होत नाही. त्यामुळे या जागेला मशिद कसं म्हणायचं? असा प्रश्नही जैन यांनी कोर्टात विचारला.