माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार जाहीर…

एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक, सहकारी साखर कारखानदारीचे जनक व सहकारी चळवळीचे अध्वर्यु पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती समारंभानिमित्त देण्यात येणाज्या साहित्य पुरस्कार प्रदान समारंभात ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत माजी कुलगुरु मा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रु. १ लाख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार श्री.किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या जुगाड या कादंबरीस (रुपये ५१ हजार व स्मृतीचिन्ह), पद्मश्री डॉ. विट्ठराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार प्रा. गो.तु.पाटील (येवला) यांच्या ओल अंतरीची या आत्मचरित्रास (रुपये २५ हजार व स्मृतीचिन्ह), तर पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या आलापल्लीचे दिवस या ललित ग्रंथास (रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) व पद्मश्री डॉ.विट्ठराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार शौलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या अस्वस्थ मनातील शब्द (रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) या काव्यसंग्रहास देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.
पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील जयंती समारंभात साहित्य पुरस्कार देण्याचे हे २९ वे वर्ष असून यावर्षीचा पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार जालना येथील राजकुमार तांगडे (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) यांना, पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार पुणे येथील शमसुद्दीन तांबोळी (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) तर नाशिक येथील धनंजय गोवर्धने यांना पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यवतमाळ येथील ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.डॉ.अरुणा ढेरे यांच्या हस्ते व मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनी (नारळी पौर्णिमा) बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी यावेळी सांगितले.