पंढरपूर तालुक्यातील ४९ गावांना पुराचा धोका?

उजनी धरण ९० टक्के भरले असल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचे पाणी शहरात सर्वत्र शिरणार आहे. सध्या चंद्रभागेच्या घाटाला पाणी लागले असून आज रात्रीपर्यंत हे पाणी घाटाच्यावर पोचणार आहे. पंढरपूर तालुक्यातील ४९ गावांना पुराचा धोका असून याही ठिकाणी प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा लावून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. उजनी धरणातील विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढवल्याने आज रात्री शहरातील काही भागाला पुराचा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सध्या वीर धरणातून १ लाख क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत होते. पाण्याचा विसर्ग रात्री ७८ हजारपर्यंत कमी करण्यात आला. विसर्ग करण्यात आलेले पाणी निरनरसिंगपूर जवळ भीमेला मिळते. त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजनीतून आज दीड लाख क्युसेक विसर्गाने पाणी पंढरपूरकडे येत आहे. दरम्यान पुण्यात अजूनही पाऊस सुरू असल्याने उजनीतील पाण्याचा विसर्ग दोन लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही धरणातील अडीच लाख क्युसेक विसर्गाने पाणी येत असून उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये आज रात्री बऱ्याच भागात पुराचे पाणी शिरणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या व्यास नारायण वसाहत, आंबाबाई पटांगण वसाहत, लखुजी देवी वसाहत या भागातील जवळपास ५०० कुटुंबाना सकाळीच सुरक्षित स्थळी हलविले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू आहे. कुष्ठरोग वसाहत , आंबेडकर नगरसह इतर भागातील लोकांनाही आता सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.