जेएनयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर टॅक्सीत बलात्कार

जेएनयूमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री टॅक्सीत बलात्कार झाल्याची घटना घडली. आपल्या मित्राच्या घरून परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी टॅक्सीचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मित्राच्या घरून परतताना आपण मदिर मार्ग येथून टॅक्सी घेतली. त्यानंतर हा प्रकार घडला. तसेच यानंतर जवळपास तीन तास आपण टॅक्सीतच होतो, अशी माहिती पीडितेने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दक्षिण दिल्लीतील एका पार्कजवळ पीडितेला बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर काही स्थानिक लोकांनी तिला रूग्णालयात दाखल केले. यावेळी तिच्यावर बलात्कार झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
रूग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपल्या हॉस्टेल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. टॅक्सी चालकाने आपल्याला खाण्यासाठी काही पदार्थ दिला होता. त्यानंतर आपण बेशुद्ध झाल्याचे तिने सांगितले. दरम्यान, पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिस संबंधित टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत.