Jammu – Kashmir कलम ३७०: राज्यसभेतील काँग्रेस प्रतोदांचा राजीनामा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यास तीव्र विरोध करणाऱ्या काँग्रेसला राज्यसभेत मोठा धक्का बसला आहे. काश्मीर मुद्द्यावर व्हिप जारी करण्यास नकार देत काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देतानाच कलिता यांनी काँग्रेसच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. ‘पंडित जवाहरलाल नेहरूंनीही कलम ३७० ला विरोध केला होता. हे कलम एक दिवस आपोआप पुसलं जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं.
आज देशातील जनतेचीही हे कलम हटवण्यात यावे, अशी भावना असताना काँग्रेसला मात्र ते मान्य नाही. हे पाहिल्यानंतर काँग्रेस पक्ष आत्महत्या करायला निघाला आहे, असं वाटतं आणि यात मला भागीदार व्हायचे नाही म्हणूनच मी पक्षाचा व्हिप पाळायचा नाही, असे ठरवले आहे. मी याक्षणी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे’, असे कलिता यांनी जाहीर केले.
काँग्रेस पक्षाचं आजचं नेतृत्व पक्षाचं वैभव धुळीस मिळवण्याचं काम करत आहे आणि काँग्रेसला उद्ध्वस्त होण्यापासून आता कोणीही वाचवू शकत नाही, असेही कलिता म्हणाले.