….मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना स्थैर्य मिळू द्या, उत्तरले देवेंद्र फडणवीस

‘चंद्रकांतदादा काय बोलले आहेत याबद्दल माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. आमच्या पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री ठरवतात. सध्यातरी मी मुख्यमंत्री आहे. तुमची कृपा आणि आशीर्वाद असतील तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना स्थैर्य मिळू द्या,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्रपदी बसण्यास सज्ज असल्याचं सुचवलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरले असून महाजनादेश यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र त्याचवेळी आगामी निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाईल, या चर्चेनं जोर धरला आहे. याबाबतच्या चर्चांना आता स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चंद्रकांत पाटील यांचं भाजपमध्ये चांगलंच वजन वाढलं आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नंबर 2 चे नेते अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ‘मला मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा नाही,’ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
‘संघटना सांगेल ती जबाबदारी मी स्वीकारतो. संघटनेनं सांगितल्यानंतर मी बांधकाममंत्री झालो, महसूलमंत्री झालो आता प्रदेशाध्यक्ष झालो. मला मुख्यमंत्रिपदाची शून्य महत्त्वाकांक्षा आहे,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.