डॉक्टरचा हलगर्जीपणा बेतला जीवावर , बाळंतपणानंतर पोटात कापसाचा बोळा राहिल्याने महिलेचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय उपरुग्णालयात २२ जुलै रोजी तनुश्री तुपे नावाची महिला प्रसुतीसाठी दाखल झाली. २३ जुलैला तनुश्रीचे सिजरिंग करण्यात आले होते. त्यावेळी तनुश्रीने मुलाला जन्म दिला. मात्र याच वेळी डॉक्टरांकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला आणि कापसाचा बोळा तनुश्रीच्या पोटात डॉक्टर विसरून गेले. मात्र लगेचच तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि २८ जुलै रोजी तिचं निधन झाले . दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचे उघड झाल्याने नातेवाईकांनी गंगापूर शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सिजरिंग नंतर दोन दिवस तनुश्रीने आपल्या बाळाला दूध पाजलं मात्र त्यानंतर तिला असह्य वेदना सुरू झाल्या, उलट्या, मळमळ व्हायला लागल्याने पुन्हा तनुश्रीच्या आई-वडिलांनी तिला गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. ज्या रवींद्र ठवाळ नावाच्या डॉक्टरांनी तनुश्रीचं सिजरिंग केलं होतं त्यांनी पुन्हा तनुश्रीची तपासणी करून पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवलं. तेथे तिच्यावर उपचार चालू असतानाच तिचे निधन झाले.
तनुश्रीच्या नातेवाईकांनी आज गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर डॉक्टर रवींद्र ठवाळ यांना निलंबित केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरांना केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्यांचा मेडिकल प्रॅक्टिसचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तनुश्रीच्या वडिलांनी केली आहे.