Mahajanadesh Yatra : मुख्यमंत्र्यांच्या वर्धा इथल्या सभेत गोंधळ, युवकाने फडकवला बॅनर

महाजनादेश यात्रेवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्धा इथल्या सभेदरम्यान थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एका युवकानं बॅनर फडकवल्यानं हा गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करताच हा युवक उभाराहिला आणि त्याने बॅनर फडकवत घोषणाबाजी केली. नंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलंय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. गुरुवारी दुपारी अमरावती जवळच्या गुरुकुंज मोझरी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवून ही यात्रा सुरू झाली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ही यात्रा वर्ध्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वर्धा येथील सभेत भाजपच्या सरपंचा विरोधात बॅनर फडकवण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडला. प्रशांत घाडे असं बॅनर फडकविणाऱ्या युवकाचं नाव आहे. कैलास काकडे या बाजार समितीचा व्यापारी आणि सरपंच आहे. त्याने बाजार समितीत आर्थिक घोळ केला आहे असं प्रशांत घाडे यांचं म्हणणं आहे. त्याची चौकशी करण्यात यावी अशी त्याची मागणी होती. सभेत मंचावर उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन हे व्यासपीठवरून खाली आले आणि त्यांनी वातावरण शांत केलं.