उन्नाव बलात्कार पीडितेवर लखनऊतच उपचार: सुप्रीम कोर्ट

उन्नाव बलात्कार प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. बलात्कार पीडितेवर लखनऊतील रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. सध्या लखनऊमध्येच उपचार सुरू ठेवा. गरज भासल्यास आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास तिला पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करता येऊ शकतं, असंही कोर्टानं स्पष्ट केलं.
मुलीवर लखनऊतील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्येच उपचार व्हावेत. उपचारासाठी दिल्लीत हलवण्यात येऊ नये, असं तिच्या आईनं सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पीडितेच्या काकांना रायबरेलीहून दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलवण्यात यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
पीडितेची ओळख उघड करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला दिले आहेत. उन्नाव प्रकरणाचं वृत्तांकन करताना पीडितेची ओळख प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या उघड होऊ नये याची खबरदारी माध्यमांनी घ्यावी, असं कोर्टानं आदेशात म्हटलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होईल.
बलात्कार पीडितेला नुकसान भरपाईपोटी २५ लाख रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारनं शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी दिली. आदल्या दिवशीच सुप्रीम कोर्टानं अपघातात गंभीर जखमी झालेल्या बलात्कार पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.