धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झोमॅटो ग्राहकाला जबलपूर पोलिसांची नोटीस

मुस्लिम तरुण जेवण घेऊन येणार म्हणून झोमॅटोची ऑनलाइन ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला मध्य प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशात जबलपूर येथे राहणाऱ्या अमित शुक्ला यांनी ही ऑर्डर रद्द केली होती. झोमॅटोला टॅग करुन त्यांनी आपली नाराजी कळवली. त्यानंतर या संपूर्ण वादाला सुरुवात झाली. झोमॅटोने ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो’ अशा आशयाचं ट्विट केले होते. त्यावर अमित शुक्ला यांनी आपली बाजू मांडताना “संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. आता यापुढे मी झोमॅटोवरुन काहीही ऑर्डर करणार नाही. मी पैसे मोजतोय त्यामुळे एखादी गोष्ट नाकारणे हा माझा अधिकार आहे. मी जेवण ऑर्डर केले त्यांनी एका बिगर हिंदू माणसाला डिलिव्हरी करण्यासाठी पाठवले. मी जेव्हा त्यांना डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी ऑर्डर रद्द केली” असे इंडिया टुडेशी बोलताना सांगितले होते.
लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर तो गुन्हा आहे असे जबलपूरचे पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी सांगितले. या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. पण टि्वटची पोलिसांनी स्वत:हून दखल घेऊन नोटीस पाठवली.