अयोध्या प्रकरणी ६ ऑगस्टपासून नियमित सुनावणी, आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी होईल सुनावणी

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर समाधानकारक तोडगा काढण्यात मध्यस्थ समिती अपयशी ठरल्यानंतर, आता या प्रकरणी ६ ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं आज दिला. जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहील, असंही कोर्टानं स्पष्ट केलं. मध्यस्थ समितीनं गुरुवारी सुप्रीम कोर्टात सीलबंद लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला होता. समाधानकारक तोडगा न निघाल्यास या प्रकरणावर दररोज सुनावणी होईल, असं याआधीच कोर्टानं स्पष्ट केलं होतं. समाधानकारक तोडगा काढण्यात समितीला अपयश आल्यानं या प्रकरणाची ६ ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं दिला.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद जमीन वादावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ समिती नेमण्यात आली होती. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळं ही समिती बरखास्त करून या प्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय कोर्टानं दिला. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सुनावणी होईल, असंही कोर्टानं सांगितलं.