ब्राह्मण समाजाला आरक्षण नकोय तर अॅट्राॅसिटी सारखा कायदा हवाय

ब्राह्मण समाजाला आरक्षण नको. मात्र, अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण द्या अशी जोरदार मागणी ब्राह्मण समाज मेळाव्यात करण्यात आली. एखाद्या प्रवृतीवरून संपुर्ण समाजाला बदनाम करण्याच्या प्रकारास आळा बसू शकेल असा सूर यावेळी उपस्थितांमधून निघाला.
माढा येथे ब्राह्मण समाज सेवा संघाच्यावतीने तालुक्यातील ब्राम्हण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजाने आरक्षण मागितले नाही. ‘सेव्ह टॅलेंट, सेव्ह नेशन’ ही संकल्पना आता पुढे येते आहे. राज्यात सुमारे दीडशे पुस्तकांमध्ये ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून समाजाची बदनामी करण्यात आली असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला. ब्राह्मण समाज पुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर समाजाला आरक्षण नको संरक्षण हवे आहे अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. त्याशिवाय, समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, उद्योगधंदे सुरू करता यावेत यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे आणि राज्यातील पौरोहित्य करणाराना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जावे या मागण्याही राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण परिषदेने समाजाच्या प्रश्नावर समाजजागृतीचे अभियान हाती घेतले असल्याचे परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनीताई पत्की यांनी सांगितले.