भारतातील कॉफी किंग ‘सीसीडी’चे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

कॅफे कॉफी डे अर्थात ‘सीसीडी’चे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांच्यावर चिकमंगळुरूतील चेतनहाल्ली या मूळगावी आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ यांचे वडील रुग्णालयात उपचार घेत असल्याने अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू शकले नाहीत. अंत्यसंस्कारांवेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते. दरम्यान, सिद्धार्थ यांची सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे नमूद करत ‘कॅफे कॉफी डे’ व्यवस्थापनाने अत्यंत भावुक शब्दांत सिद्धार्थ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतातील कॉफी किंग म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होते. मंगळुरू येथील नेत्रावती नदीकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी सिद्धार्थ यांच्या जाण्याने ‘कॅफे कॉफी डे’ला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘कॅफे कॉफी डे’ने सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरील आपल्या लोगोचं लाल रंगाचं बॅकग्राउंड बदललं व काळं केलं. ‘भारताला प्रत्येक कपात आनंद गवसला तो केवळ तुमच्याचमुळे. आम्ही तुम्हाला मिस करतोय!’, असे वाक्य सीसीडीच्या ट्विटर कव्हर फोटोवर लिहिण्यात आले आहे.
सीसीडीने इंस्टाग्रामवरही सिद्धार्थ यांचा फोटो पोस्ट करून भावुक संदेश लिहिला आहे. ‘आमचे लाडके चेअरमन व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.