लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण , येत्या वर्षात मातंग समाजासाठी १ लाख घरे : मुख्यमंत्री

येत्या एक वर्षांत मातंग समाजासाठी १ लाख घरे देणार असल्याची घोषणा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात बोलत होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यावर्षात मातंग समाजासाठी अनेक विकास कामं करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
‘मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी शासन पूर्ण ताकदीनिशी योगदान देईल. मातंग समाजाला एक लाख घरे देण्यात येतील. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल.
पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल’. अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे. ‘अण्णा भाऊ साठे यांनी 49 वर्षाच्या खडतर आयुष्यात वंचित शोषितांच्या व्यथांना आपल्या साहित्यातून आवाज दिला. अण्णा भाऊंची साहित्य निर्मिती जगासाठी आकर्षण बिंदू होती’, असं त्यांनी सांगितलं. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.