विकृतीची आणि क्रौर्याची परिसीमा : साडेतीन वर्षाच्या मेहुणीवर केला बलात्कार , आरोपीला ठोक्या बेड्या

विकृतीची आणि क्रौर्याची परिसीमा ठरावी अशी संतापजनक आणि लज्जास्पद घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच अवघ्या साडेतीन वर्षांच्या मेव्हणीवर बलात्कार केला असल्याचे हे वृत्त आहे . पोलिसांनी आरोपीविरोधात ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . आरोपीची पत्नी लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याला सोडून माहेरी राहण्यास गेली होती, त्याचा राग मनात धरुन बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपीने पत्नीच्या बहिणीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी (दि.३१) पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्यात. हैदराबादच्या मैलारदेवपल्ली पोलीस स्थानकाअंतर्गात ही घटना घडलीये.
”आरोपी आणि पीडित कुटुंब मूळ बिहारचे रहिवासी असून येथे ते मजुरीचं काम करतात. आरोपीचं साधारण तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नी त्याला सोडून गेली. घटना घडली त्यावेळी पीडित चिमुकलीचे पालक कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांनी चिमुकलीला सांभाळण्यासाठी दुसऱ्यांकडे दिलं होतं. ज्यांच्याकडे पीडित चिमुकलीला सांभाळण्यासाठी दिलं होतं ते लोक आरोपीला ओळखायचे. त्यांच्या घरी आरोपीचं नेहमी येणंजाणं होतं, त्यामुळे त्यांनी चिमुकलीला आरोपीच्या ताब्यात दिलं. त्यानंतर आरोपी तिला घेऊन चंद्रायनगुट्टा येथे एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि दारुच्या नशेत त्याने मुलीवर बलात्कार केला. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय कामावरुन घरी परतल्यानंतर चिमुकली गायब असल्याचं त्यांना कळालं. त्यावर मुलीचा शोध त्यांनी सुरू केला. रात्री ९ च्या सुमारास घराजवळच मुलगी सापडली. आरोपीच मुलीला घराजवळ सोडून गेला होता,” अशी माहिती शमशाबाद येथील पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिली. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याने स्वतःच्या सासूलाही फोन केला आणि पत्नी परत येत नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलंय.
घटनेनंतर रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. सध्या पोलिसांनी चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी त्याच्या घरातूनच बेड्या घातल्या.