डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिन्हीही आरोपी महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई हायकोर्टानं आज, सोमवारी आठवडाभरासाठी तहकूब केली. त्यामुळं आरोपी डॉक्टर महिलांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
डॉक्टर हेमा अहुजा (वय २८), डॉ. अंकिता खंडेलवाल (वय २७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी हायकोर्टात अपिल केले आहे. २३ जुलै रोजी कोर्टानं आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब केली होती.