उन्नाव बलात्कार पीडितेचा अपघातहोता की घातपात ? सीबीआय चौकशीचा उत्तर प्रदेश पोलिसांचा निर्णय

उन्नाव बलात्कार पीडितेचा अपघातहोता की घातपात, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला असतानाच, हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआयचौकशीची मागणी केली असल्याचे पोलिसांनी राज्य सरकारला सांगितले. त्याची दखल घेत राज्य सरकारने सीबीआय चौकशीच्या मागणीचे पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे.
उन्नाव येथील पीडित मुलगी, तिची मावशी आणि काकी, तसेच तिचे वकील रविवारी एका कारमधून जात होते. रायबरेली येथील गुरबख्श गंज भागात त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. तर तिची मावशी आणि काकीचा मृत्यू झाला. वकिलाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी ट्रक चालक, मालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे घातपाताचा कट असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली. पीडितेच्या कुटुंबीयांनीही या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी एक बंदुकधारी पोलीस आणि दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल २४ तास तैनात करण्यात आले आहेत. मात्र, अपघातावेळी ते तिथे उपस्थित नव्हते,’ असं उन्नावचे पोलीस अधीक्षक एम. पी. वर्मा यांनी सांगितले.